Sunday 18 December 2016

दातांचे आरोग्य....


रोग्य चांगले रहावे म्हणून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या बाबी आवश्यक असल्या तरी दातांचे आरोग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळूनही शरीराला व्याधी जडू शकतात. किडलेले दात आणि दुर्गंधी श्वासामुळे हृदयरोगही जडू शकतो. परंतु, थोडी काळजी घेतली तर सुंदर दात आणि चांगले आरोग्य लाभू शकते. जवळजवळ 90 टक्के लोकांना दातांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते. पण, योग्य निगा राखल्यास आणि दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घेतल्यास यातील बर्याच समस्या नाहीशा होऊ शकतात. दात दुखणे, थंड किंवा पदार्थाने ठणका येणे, किडणे (कॅव्हिटी), पायरिया (हिरडय़ांमधून रक्त येणे), श्वासात दुर्गंधी येणे आणि दातांचा रंग खराब होणे या समस्या मोठय़ा प्रमाणावर आढळतात.

दात दुखणे ही खरे तर व्याधी नसून व्याधीचे लक्षण आहे. दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. दात किडणे, हिरडय़ा सुजणे, थंड किंवा गरम पदार्थ लागणे यामुळे दात दुखू शकतात. बहुतेक वेळा दात दुखण्याचे मुख्य कारण किड लागणे हे असते. गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाल्ल्याने दातांवर जीवाणू आक्रमण करतात आणि त्यामुळे दात खराब होऊ लागतात. दात किडून त्यात कॅव्हिटिज तयार होतात. अशा परिस्थितीत दातांची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर त्यांच्यावर थर जमा होतात. त्यात जीवाणू टॉक्सिन्स तयार करतात. त्यामुळे दातांचे अधिक नुकसान होते. किड टाळण्यासाठी गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. जेवणानंतर दात घासणे किंवा ते शक्य न झाल्यास योग्य प्रकारे चूळ भरणे असे केल्यानेही किड लागण्याची शक्यता कमी होते. दातांवर काळपट डाग दिसू लागले, खाद्यपदार्थ अडकू लागले किंवा थंड आणि गरम पदार्थांनी दातांना ठणका लागू लागला की किडीला सुरूवात झाली असे समजावे. सुरूवातीला कॅव्हिटिज भरून (फिलिंग) ही प्रक्रिया थांबवता येते.

दात दुखू लागले तर थंड किंवा गरम पदार्थ खाणे टाळावे. शिवाय एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून चूळ भरावी. असे केल्याने कॅव्हिटिजमध्ये अडकलेले अन्नकण निघून जातात. कापसाच्या बोळ्यावर लवंगतेल टाकून दात दुखत असलेल्या ठिकाणी तो बोळा धरावा. हे तेल हिरडय़ांना लागू देऊ नये. लवंगतेल नसेल तर लवंग दाताखाली धरली तरी चालते. गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घ्यावीत. परंतु, कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अस्थमा असलेल्या लोकांनी कॉम्बीफ्लामऐवजी व्होव्हेरॉन घ्यावी. वेदनाशामकांमुळे तात्पुरता आराम मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर दंतवैद्याकडे जाणे योग्य. हिरडय़ांवर सूज आल्याने दात दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ किंवा डिस्परीन टाकून चूळ भरल्यास आराम मिळतो. हिरडय़ा दुखत असल्यास चुकूनही लवंग किंवा लवंगतेलाचा वापर करू नये. लवंगतेल हिरडय़ांना लागल्यास हिरडय़ांवर फोड येऊ शकतात. गुळण्या करून दुखणे कमी न झाल्यास वेदनाशामके घ्यावीत. परंतु, लवकरात लवकर डॉक्टरकडे जावे.

श्वासांना दुर्गंधी येत असेल तर अनेकांना ती पोट साफ होत नसल्याचे तक्रार आहे असे वाटते. परंतु, 95 टक्के लोकांमध्ये हिरडय़ा आणि दातांची योग्य सफाई न झाल्यामुळे आणि त्यात  किड झाल्याने दुर्गंधी निर्माण होते. जेवण झाल्यानंतर योग्य प्रकारे दात आणि हिरडय़ा साफ केल्या नाहीत तर अन्नकणांवर जीवाणू गंधकाची संयुगे तयार करतात. त्यामुळे श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी तोंडाच्या आत जीभेच्या मागच्या बाजूला तसेच हिरडय़ांच्या खालच्या बाजूला तयार होते. लसूण, कांदा अशा पदार्थांमुळेही श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. पोटात जंत होणे, अन्नाचे योग्य पचन न होणे, गळ्यात संसर्ग होणे किंवा दात किडल्यानेही श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी निर्माण होण्याचे कारण ओळखूनच त्यावर इलाज केला जातो. दुर्गंधीवर तत्काळ मात करण्यासाठी बडीशेप, लवंग, तुळशी किंवा पुदिन्याची पाने चावावीत. मिंट किंवा इतर सुवासिक पण शुगरफ्री च्युईंग गम चावल्याने दुर्गंधी कमी होते. च्युईंग गम चावल्याने अधिक लाळ निर्माण होते आणि या लाळेमुळे दुर्गंधी कमी होते. अधिक पाणी पिल्यानेही हा परिणाम साधता येतो.

खरे तर प्रत्येक जेवणानंतर किंवा खाण्यानंतर ब्रश करायला हवा. परंतु, ते शक्य होत नाही. म्हणून दिवसातून किमान दोनदा ब्रश करावा. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासायला हवेत. रात्री दात घासले असतील तर सकाळी नाश्त्यानंतर दात घासले तरी चालते. किमान ते चार मिनिटे दात घासावेत. दात घासताना सॉफ्ट ब्रशचा वापर करावा आणि दातांवर हळूवार दाब देऊन तोंडाच्या एका बाजूने ब्रशिंग सुरू करून दुसर्या बाजूपर्यंत ते करावे. दातांमध्ये वरून खालपर्यंत तसेच खालून वरपर्यंत ब्रश फिरवावा. दात आणि हिरडय़ांच्या मध्ये असलेल्या जागेची सफाईही चांगल्या प्रकारे करावी. टंग क्लिनरच्या सहाय्याने जीभेची सफाई करावी. ब्रश किंवा बोटाच्या सहाय्याने हिरडय़ांची मालिश करावी. असे केल्यास हिरडय़ा मजबूत होतात. ब्रश सॉफ्ट आणि पुढील बाजूस निमुळता असावा. दोन-तीन महिन्यांनंतर किंवा ब्रिसल्स आकार बदलल्यानंतर नवीन ब्रश घ्यावा. रोज गरम पाण्याने ब्रिसल्स सॉफ्ट राहतात. दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी रोज फ्लॉसिंग करावे. फ्लॉसिंगमुळे ब्रश पोहचू शकत नाही अशा ठिकाणी सफाई करता येते.

टूथपेस्टमुळे दात साफ होतात तसेच श्वासही सुगंधी होतात. फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरल्यास दात किडण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्यासे दातांवर डागही पडू शकतात. सहा वर्षांहून लहान असलेल्या मुलांना फ्लोराईड असलेली टूथपेस्ट देऊ नये. दात स्वच्छ आणि चमकदार दिसण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील.

* बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईड एकत्र करून पेस्ट तयार करा. आठवडय़ातून एकदा या पेस्टने दात घासा.
* संत्र्याच्या सालीची आतली बाजू दातांवर घासल्यास दात साफ होतात. असे कधी कधी करावे.
* लिंबाचा रस आणि काळे मीठ समप्रमाणात घेऊन दातांच्या पिवळ्या भागावर हळूहळू घासावे. हे मिश्रण हिरडय़ांवर लावल्यावरही फायदा होतो.
* एक कप पाण्यात अर्धा चमचा काळे मीठ टाकावे. रात्री झोपण्यापूर्वी या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
* तुळशीच्या पानांची पेस्ट तया करून त्यात थोडी साखर मिसळा. मधुमेह असेल तर साखरेऐवजी मधाचा वापर करा. हे मिश्रण हळूहळू दातांवर घासल्यास दात स्वच्छ होऊन श्वासही चांगला होतो.
* बडीशेप खाल्ल्याने श्वासांची दुर्गंधी नाहीशी होते.
* एक कप पाण्यात एक चमचा मध मिसळून या पाण्याने गुळण्या (गार्गल) कराव्यात.

  • वरीलपैकी कोणताही उपाय आठवडय़ातून दोनपेक्षा अधिक वेळा करू नये.


तोंडाचे आरोग्य चांगले नसेल तर हृदयविकारही जडू शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार या दोन्ही बाबींमध्ये संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार हृदयविकाराच्या 40 टक्के रुग्णांचे दात किंवा हिरडय़ांमध्ये समस्या असल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात दात खराब होतात किंवा हिरडय़ांमध्ये सूज येते तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. कारण दातांमध्ये असलेले जीवाणू रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यात प्लाक (अडथळे) निर्माण करतात.  याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामाबरोबरच दातांची आणि हिरडय़ांची योग्य काळजी घेतली तर संपूर्ण आरोग्य चांगले राहण्याची शक्यता वाढते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment