Saturday 17 December 2016

आरोग्यदायी तुळस.

भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळस ही कफ नाशक व पाचक आहे. सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे. तुळशीची पाने, आले व गुळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.चहा, कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले. तुळशीची पाने जेवल्यावर खाल्यास पचन चांगले होते. तुळसी रस कायम प्राशन केल्यास मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी,डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत. स्मरण शक्ती वाढण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्यात पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होते.
तुळशीचे उपयोग अनेक - थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.
लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन (अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम) करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता, वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.
तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते.

1 comment: