Sunday 18 December 2016

कंबर, पाय, दात दुखण्यांवर हे करून पहा...


बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी असतात अगदी किरकोळ पण आपल्याला बेचैनी देण्यास त्या पुरेश्या ठरतात. दात दुखणारा माणूस अन्य कशातही लक्ष घालू शकत नाही तसेच कंबर दुखणारा कोणतीच हालचाल सहज करू शकत नाही. मात्र किरकोळ पण वेळच्या वेळी केलेल्या उपचारांमुळे या कटकट्या स्वरूपाच्या दुखण्यातून मुक्तता मिळविता येते.

१) पाय दुखणे- मध्यमवयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली तसेच सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहातो. यावर  पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत. महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.

२)कंबर दुखी- विशेषत महिलांची – रात्री झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.

३) उसण भरणे- कोठेही उसण भरली अथवा लचक आली तर मोहरीचे तेल मालिश करून लावावे व मग तो भाग शेकावा.

४) बारीकसा अस्थिभंग (हेअर क्रॅक )- बर्‍याचवेळा पडल्याने अथवा पाय मुरगळणे या सारख्या प्रकारात हाडाला बारीकशी चीर पडते. यामुळे वेदना होतातच पण बर्‍याच वेळा अवयव सुजतो. या प्रकारात कच्च्या डिंकाचे लाडू खाण्याने ही चीर लवकर भरून येण्यास मदत होते.

५) दात दुखणे- आजकाल अगदी बालवयापासून दातदुखी हा विकार आढळतो. त्रिफळा चुर्णाने दात घासल्याने दातदुखी थांबतेच पण दात आवळून येतात. मायफळाची पावडर हिरडयांना लावून अर्ध्या तासाने चुळा भराव्यात. हिरडयांना सूज असेल तरी त्रिफळा चूर्ण लावल्याने आराम मिळतो.

६) पोटदुखी- ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.

७) जुलाब- जुलाब होत असतील तर खसखस तुपात परतावी व दुधात शिजवावी. २ चमचे खसखस घ्यावी. हे मिश्रण प्यायल्याने जुलाब थांबतात. अगदी लहान बाळाला जुलाब होत असतील तर जायफळ उगाळून साखरेबरोबर चाटवावे.

८) उलटी- उलट्या होत असतील तर धने रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते पाणी धन्यासकट उकळावे. यात साखर व मीठ घालून थोडे थोडे पाजत राहावे.

९) अपचन- अपचनावर लंघन हा सर्वात्तम उपाय आहे. लिंबू ,मीठ घालून केलेले शरबत थोडेथोडे थोडया वेळाने पिण्यानेही फरक पडतो. अननसाच्या फोडी त्यावर साखर घालून खाव्यात त्यानेही पचन सुधारते.

१०) शौचास खडा होणे- ही सवय बर्‍याच लोकांना असते.त्यासाठी वेगवगळी औषधे ही घेतली जातात. रात्री झोपताना हळद व आवळकाठी यांचे मिश्रण घेतल्यानेही खडा मोडतो.  १ चमचा आवळकाठी अधिक १ चमचा हळद एकत्र करून त्याच्या  सारख्या आठ पुडया कराव्यात व रात्री झोपताना रोज १ पुडी या प्रमाणे आठ दिवस घ्याव्यात.

________________________________________________________________________

किरकोळ दुखण्यांसाठी घरगुती उपचार


आपण स्वतःची कितीही काळजी घेतली तरी अनेक बारीक सारीक दुखणी किंवा जखमा आपल्याला होतातच. आणि अशी बारीकसारीक दुखणी होणे किवा जखमा होणे हे आपल्या इतके अंगवळणीही पडलेले असते की त्यासाठी विशेष कांही करावे असे आपल्या मनातही येत नाही. स्वयंपाकघरात काम करणार्‍या महिलांना तर सतत भाजणे, कापणे असल्या छोट्या प्रसंगाना सततच सामोरे जावे लागते. बरेच वेळा या असल्या जखमांकडे दुर्लक्षही केले जाते कारण त्या आपोआपच बर्‍याही होत असतात. मात्र तरीही असल्या दुखण्यांवर लगेच डॉक्टरकडे धाव न घेता स्वयंपाकघरातलेच पदार्थ वापरून चांगले उपचार करता येतात. असे कांही उपचार 

१) कापणे- हातापायाला व अन्य कोठेही कापले असेल व थोडेच रक्त येत असेल तर तेथे हळद भरावी. एरंडेल तेल लावल्यानेही कापलेली जखम लवकर भरते व रक्तही थांबते. मात्र कापण्याची तीव्रता अधिक असेल व रक्तस्त्राव जास्त होत असेल तर जखमेत काताची (विडयात घालतो त्या) बारीक पूड भरावी. 

२) भाजणे- भाजलेल्या जागी खोबरेल तेल लावावे. 

३) बोटे आखडणे- बोटे आखडणे हे रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे होत असते. यावर शेकणे व बोटांची हालचाल करण्याने आराम पडतो. 

४) घामोळे- उन्हाळयात हा त्रास मुख्यत्वे होतो. चंदन पावडर अंगावर टाकून तासभर ठेवावी व मग आंघोळ करावी. अथवा धन्याची अगदी बारीक पावडर करून याच पद्दतीने १ तास अंगावर ठेवून मग आंघोळ करावी. याने घामोळ्याचा त्रास खूपच कमी होतो व त्वचेला गारवाही मिळतो. 

५) भूक न लागणे - अनेकवेळा आपल्याला कडकडून भूक लागत नाही आणि अस्वस्थता येते. अशावेळी गरम पाण्यात लिंबू सरबत करून थोडे थोडे सरबत थोडया थोडया वेळाने घ्यावे. पचन सुधारून भूक लागण्यास त्यामुळे मदत मिळते. 

६) थंडीत अंग फुटणे- थंडीच्या दिवसात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते व परिणामी अंग फुटते. त्यावर १ भाग एरंडेल व २ भाग खोबरेल तेल एकत्र करून गरम करावे. त्यामुळे त एकजीव होइल. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा अंगाला चोळावे. त्यामुळे त्वचा नरम राहते. 

७) कीटक. मधमाशी, विचू दंश - हा प्रकार तसा अनपेक्षितपणे होणारा असतो. दंश झालेल्या जागी जळजळ होते व बरेचवेळा वेदनाही होतात. अशावेळी दंशाच्या जागेवर एरंडेल तेल लावावे.एरंडेल तेलामुळे शरीरात दंशामुळे गेलेले विष बाहेर निघून जाण्यास मदत मिळते. 

८) उचकी लागणे- उचकी हा धड आजार ही नाही आणि विकारही नाही. मात्र उचकी थांबत नसेल तर अस्वस्थता येते आणि माणूस बेचैन बनतो. अशावेळी गार दूध प्यावे. दुसरा उपाय नारळाची शेंडी जाळून केलेला धूर नाकात ओढावा अथवा कोणत्याही उपायाने शिंक काढावी. उचकी थांबते. यकृताला काही इजा झाल्याने उचकी लागत असेल तर मात्र ती या उपायाने थांबत नाही. अशावेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

______________________________________________________________________

दातांचे आरोग्य....


रोग्य चांगले रहावे म्हणून योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या बाबी आवश्यक असल्या तरी दातांचे आरोग्य चांगले नसेल तर इतर सर्व पथ्य पाळूनही शरीराला व्याधी जडू शकतात. किडलेले दात आणि दुर्गंधी श्वासामुळे हृदयरोगही जडू शकतो. परंतु, थोडी काळजी घेतली तर सुंदर दात आणि चांगले आरोग्य लाभू शकते. जवळजवळ 90 टक्के लोकांना दातांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते. पण, योग्य निगा राखल्यास आणि दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घेतल्यास यातील बर्याच समस्या नाहीशा होऊ शकतात. दात दुखणे, थंड किंवा पदार्थाने ठणका येणे, किडणे (कॅव्हिटी), पायरिया (हिरडय़ांमधून रक्त येणे), श्वासात दुर्गंधी येणे आणि दातांचा रंग खराब होणे या समस्या मोठय़ा प्रमाणावर आढळतात.

दात दुखणे ही खरे तर व्याधी नसून व्याधीचे लक्षण आहे. दात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. दात किडणे, हिरडय़ा सुजणे, थंड किंवा गरम पदार्थ लागणे यामुळे दात दुखू शकतात. बहुतेक वेळा दात दुखण्याचे मुख्य कारण किड लागणे हे असते. गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाल्ल्याने दातांवर जीवाणू आक्रमण करतात आणि त्यामुळे दात खराब होऊ लागतात. दात किडून त्यात कॅव्हिटिज तयार होतात. अशा परिस्थितीत दातांची योग्य प्रकारे सफाई केली नाही तर त्यांच्यावर थर जमा होतात. त्यात जीवाणू टॉक्सिन्स तयार करतात. त्यामुळे दातांचे अधिक नुकसान होते. किड टाळण्यासाठी गोड आणि स्टार्च असलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. जेवणानंतर दात घासणे किंवा ते शक्य न झाल्यास योग्य प्रकारे चूळ भरणे असे केल्यानेही किड लागण्याची शक्यता कमी होते. दातांवर काळपट डाग दिसू लागले, खाद्यपदार्थ अडकू लागले किंवा थंड आणि गरम पदार्थांनी दातांना ठणका लागू लागला की किडीला सुरूवात झाली असे समजावे. सुरूवातीला कॅव्हिटिज भरून (फिलिंग) ही प्रक्रिया थांबवता येते.

दात दुखू लागले तर थंड किंवा गरम पदार्थ खाणे टाळावे. शिवाय एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून चूळ भरावी. असे केल्याने कॅव्हिटिजमध्ये अडकलेले अन्नकण निघून जातात. कापसाच्या बोळ्यावर लवंगतेल टाकून दात दुखत असलेल्या ठिकाणी तो बोळा धरावा. हे तेल हिरडय़ांना लागू देऊ नये. लवंगतेल नसेल तर लवंग दाताखाली धरली तरी चालते. गरज पडल्यास वेदनाशामक औषधे घ्यावीत. परंतु, कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अस्थमा असलेल्या लोकांनी कॉम्बीफ्लामऐवजी व्होव्हेरॉन घ्यावी. वेदनाशामकांमुळे तात्पुरता आराम मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर दंतवैद्याकडे जाणे योग्य. हिरडय़ांवर सूज आल्याने दात दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ किंवा डिस्परीन टाकून चूळ भरल्यास आराम मिळतो. हिरडय़ा दुखत असल्यास चुकूनही लवंग किंवा लवंगतेलाचा वापर करू नये. लवंगतेल हिरडय़ांना लागल्यास हिरडय़ांवर फोड येऊ शकतात. गुळण्या करून दुखणे कमी न झाल्यास वेदनाशामके घ्यावीत. परंतु, लवकरात लवकर डॉक्टरकडे जावे.

श्वासांना दुर्गंधी येत असेल तर अनेकांना ती पोट साफ होत नसल्याचे तक्रार आहे असे वाटते. परंतु, 95 टक्के लोकांमध्ये हिरडय़ा आणि दातांची योग्य सफाई न झाल्यामुळे आणि त्यात  किड झाल्याने दुर्गंधी निर्माण होते. जेवण झाल्यानंतर योग्य प्रकारे दात आणि हिरडय़ा साफ केल्या नाहीत तर अन्नकणांवर जीवाणू गंधकाची संयुगे तयार करतात. त्यामुळे श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी तोंडाच्या आत जीभेच्या मागच्या बाजूला तसेच हिरडय़ांच्या खालच्या बाजूला तयार होते. लसूण, कांदा अशा पदार्थांमुळेही श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. पोटात जंत होणे, अन्नाचे योग्य पचन न होणे, गळ्यात संसर्ग होणे किंवा दात किडल्यानेही श्वासांमध्ये दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी निर्माण होण्याचे कारण ओळखूनच त्यावर इलाज केला जातो. दुर्गंधीवर तत्काळ मात करण्यासाठी बडीशेप, लवंग, तुळशी किंवा पुदिन्याची पाने चावावीत. मिंट किंवा इतर सुवासिक पण शुगरफ्री च्युईंग गम चावल्याने दुर्गंधी कमी होते. च्युईंग गम चावल्याने अधिक लाळ निर्माण होते आणि या लाळेमुळे दुर्गंधी कमी होते. अधिक पाणी पिल्यानेही हा परिणाम साधता येतो.

खरे तर प्रत्येक जेवणानंतर किंवा खाण्यानंतर ब्रश करायला हवा. परंतु, ते शक्य होत नाही. म्हणून दिवसातून किमान दोनदा ब्रश करावा. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासायला हवेत. रात्री दात घासले असतील तर सकाळी नाश्त्यानंतर दात घासले तरी चालते. किमान ते चार मिनिटे दात घासावेत. दात घासताना सॉफ्ट ब्रशचा वापर करावा आणि दातांवर हळूवार दाब देऊन तोंडाच्या एका बाजूने ब्रशिंग सुरू करून दुसर्या बाजूपर्यंत ते करावे. दातांमध्ये वरून खालपर्यंत तसेच खालून वरपर्यंत ब्रश फिरवावा. दात आणि हिरडय़ांच्या मध्ये असलेल्या जागेची सफाईही चांगल्या प्रकारे करावी. टंग क्लिनरच्या सहाय्याने जीभेची सफाई करावी. ब्रश किंवा बोटाच्या सहाय्याने हिरडय़ांची मालिश करावी. असे केल्यास हिरडय़ा मजबूत होतात. ब्रश सॉफ्ट आणि पुढील बाजूस निमुळता असावा. दोन-तीन महिन्यांनंतर किंवा ब्रिसल्स आकार बदलल्यानंतर नवीन ब्रश घ्यावा. रोज गरम पाण्याने ब्रिसल्स सॉफ्ट राहतात. दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी रोज फ्लॉसिंग करावे. फ्लॉसिंगमुळे ब्रश पोहचू शकत नाही अशा ठिकाणी सफाई करता येते.

टूथपेस्टमुळे दात साफ होतात तसेच श्वासही सुगंधी होतात. फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरल्यास दात किडण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्यासे दातांवर डागही पडू शकतात. सहा वर्षांहून लहान असलेल्या मुलांना फ्लोराईड असलेली टूथपेस्ट देऊ नये. दात स्वच्छ आणि चमकदार दिसण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील.

* बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईड एकत्र करून पेस्ट तयार करा. आठवडय़ातून एकदा या पेस्टने दात घासा.
* संत्र्याच्या सालीची आतली बाजू दातांवर घासल्यास दात साफ होतात. असे कधी कधी करावे.
* लिंबाचा रस आणि काळे मीठ समप्रमाणात घेऊन दातांच्या पिवळ्या भागावर हळूहळू घासावे. हे मिश्रण हिरडय़ांवर लावल्यावरही फायदा होतो.
* एक कप पाण्यात अर्धा चमचा काळे मीठ टाकावे. रात्री झोपण्यापूर्वी या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
* तुळशीच्या पानांची पेस्ट तया करून त्यात थोडी साखर मिसळा. मधुमेह असेल तर साखरेऐवजी मधाचा वापर करा. हे मिश्रण हळूहळू दातांवर घासल्यास दात स्वच्छ होऊन श्वासही चांगला होतो.
* बडीशेप खाल्ल्याने श्वासांची दुर्गंधी नाहीशी होते.
* एक कप पाण्यात एक चमचा मध मिसळून या पाण्याने गुळण्या (गार्गल) कराव्यात.

  • वरीलपैकी कोणताही उपाय आठवडय़ातून दोनपेक्षा अधिक वेळा करू नये.


तोंडाचे आरोग्य चांगले नसेल तर हृदयविकारही जडू शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार या दोन्ही बाबींमध्ये संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार हृदयविकाराच्या 40 टक्के रुग्णांचे दात किंवा हिरडय़ांमध्ये समस्या असल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात दात खराब होतात किंवा हिरडय़ांमध्ये सूज येते तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. कारण दातांमध्ये असलेले जीवाणू रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यात प्लाक (अडथळे) निर्माण करतात.  याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामाबरोबरच दातांची आणि हिरडय़ांची योग्य काळजी घेतली तर संपूर्ण आरोग्य चांगले राहण्याची शक्यता वाढते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

तुळशीचे काही व्यावहारिक उपयोग पाहू.

तुळशीचे काही व्यावहारिक उपयोग पाहू. 



  1. तुळस ही हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलायटीस, दमा अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे. आयुर्वेदाप्रमाणे तुळस ही कफहर, थंडीतापात ज्वरहर, अरुची, जंत, विष, कुष्ठ, मळमळ यांचा नाश करणारी पण उष्ण आणि पित्तकारक आहे. 
  2. तुळशीची पाने दातांखाली धरल्यास रक्त येणे थांबून हिरड्यांची सूज कमी होते. विड्याच्या म्हणजे नागवेलीच्या पानासारखे श्रीलंकेत तुळशीचे पान कात, सुपारी घालून खातात, त्याने तोंडाचे, घशाचे विकार होत नाहीत. मूत्ररोग, पुरुषांचे रोग, उष्णतेचे विकार यामध्ये तुळशीचे बी अत्यंत उपयोगी आहे. 
  3. पुरुषाच्या काही विकारात तुळशीचे मूळ देखील अत्यंत उपयुक्त आहे. तुळशीचे बी वापरताना साधारणपणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून टाकून हे बुळबुळीत झालेले बी दुधात साखरे सहित मिसळून घेतल्याने उष्णतेचे विकार बरे होतात. 
  4. स्त्रियांच्या विकाराताही तुळशीचे अनेक उपयोग आहेत. गरम पाण्यात लिंबाचा रस, अथवा आल्याचा रस, मुठभर तुळशीची पाने आणि मुठभर पुदिन्याची पाने या सर्वांची वाफ चेहरयावर घेतल्यास चेहऱ्यावरील वांग, काळे डाग वगैरे जाण्यास मदत होते. अगदी महत्वाचे म्हणजे तुळशीच्या मूळ आणि खोडाच्या उगाळून केलेल्या लेपाच्या गंधाने लेपण कपाळावर केल्यास जेनेटिक रोग [शरीरातील गुणसूत्रांमध्ये विचित्र बदल होऊन होणारे रोग], आनुवंशिक रोग बरे होऊ शकतात. 
  5. योग्य वैद्य किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास खूप उपयोग होऊ शकतो. कोठेही विश्वास हा महत्वाचा आहे. तुळशीचे शेकडो उपयोग आहेत. ते या छोट्याश्या लेखात देणे शक्य नाही आणि तो लेखाचा हेतूही नाही. माझ्या प्रत्येक लेखात त्या त्या गोष्टीबद्दल प्रचलित नसलेली आणि विज्ञानाचा पाया असलेली माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. 

अखेरीस एक सांगावेसे वाटते की तुळस ही फक्त एक वनस्पती नसून एक संस्कृती आहे. कधी तणावात असाल, कंटाळले असाल तर तुळशीचा वास घेऊन बघा ...कसे शांत, तणावरहित वाटते ते........!!!! 
तुळशीच्या वासानेच एक प्रकारची पवित्र, मंगल अशी आध्यात्मिक अनुभूती येते. म्हणून मित्रांनो घराजवळ एक तरी तुळशीचे रोप लावाच आणि देशसेवा, समाजसेवा, विश्व्सेवा आणि निसर्गसेवा करा. छातीवर बिल्ला लावून आणि दारावर समाजसेवक अशी पाटी लावूनच फक्त समाजसेवा होत नसते. ती अशा छोट्या छोट्या गोष्टतूनही पुढे जाते. 

आपण आपल्या धार्मिक परंपरा, चालीरीती, सण, उत्सव, कर्मकांड या सारयांकडे स्वच्छ, निर्मल आणि तरीही सजगतेने पहायला शिकू या. आणि या भारतमातेचा, वैदिक धर्माचा झेंडा सारया विश्वात मोठ्या विश्वासाने, डौलाने फड्कावूया.... चला मित्र, मैत्रिणींनो, बंधुंनो, भगिनींनो चला.....स्वत:च्या परंपरांकडे उपहासाने बघण्याचा दृष्टीकोन टाकून जग बदलूया........ मी केव्हाच त्या वाटेवर निघालोय....तुम्ही? 
**********************************************************************************************************************************

Saturday 17 December 2016

आरोग्यदायी तुळस.

भारतीय समाजात तुळशीला एवढे मानाचे स्थान देण्याचे कारण तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळस ही कफ नाशक व पाचक आहे. सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे. तुळशीची पाने, आले व गुळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.चहा, कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले. तुळशीची पाने जेवल्यावर खाल्यास पचन चांगले होते. तुळसी रस कायम प्राशन केल्यास मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी,डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत. स्मरण शक्ती वाढण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्यात पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होते.
तुळशीचे उपयोग अनेक - थंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.
लघू, रुक्ष, तीक्ष्ण गुणांच्या योगे तुळशी लेखन (अनावश्‍यक चरबी कमी करण्याचे काम) करते. तुळशीच्या पानांचे चूर्ण, नागरमोथा, जव वगैरे द्रव्यांपासून बनवलेले उटणे अंगाला चोळले असता, वाढलेली चरबी कमी होते. कफदोषामुळे झालेल्या त्वचारोगात त्वचा जाड, निबर होताना दिसते, त्यावरही तुळशीचा रस चोळण्याचा उपयोग होताना दिसतो.
तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा, स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो. मुखामध्ये कफदोष चिकटपणा तयार करतो किंवा जिभेवर पांढरा थर जमा होतो, तो काढण्यासाठी तुळस उपयोगी असते. तुळशीची दोन-तीन पाने चावून खाण्यानेही हे काम होताना दिसते. जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा हा गुण उपयोगी पडताना दिसतो. विशेषतः पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरवण्याचा उपयोग होतो. जंतुसंसर्ग झालेली जखम तुळशीच्या पानांच्या काढ्याने धुण्याने जखम शुद्ध व्हायला व भरून यायला मदत मिळते.